Saturday, October 9, 2010

आरती महालक्ष्मीची ( जेष्ठा गौरीपूजन )


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी करवीरी तूं विश्वाच्या लक्ष्मी ॥ धृ. ॥
श्रीपति तुझीया योगें श्रीहरिला नाम । ब्रह्मादिकही ध्याती पुरविसी तत्काम ॥
निष्कामें जें भजती पावति निजधामा । योगी ध्याने पावति पद आत्माराम ॥ जय. ॥ १ ॥

जपतपसिद्धी तुजविण कांही साधेंना । प्रसन्न होतां भक्तां भवभय बाधेना ॥
तुजवाचुनिया अंबे शांती लाधेना । वेदांतीचें सारहि शिष्या बोधेना ॥ जय. ॥ २ ॥

गर्जति निगमागम परि वाणिला गौप्य । जें जें वर्णिती तें तें माये तव रुप ॥
कोण करि मग तुझ्या सगुणत्वा माप । स्तवितां सहस्त्र वदनी श्रमला कीं साप ॥ जय. ॥ ३ ॥

दंभे दर्पे माने क्रोधे जे रहित । भजति तव चरणां त्वां साधे आत्महित ॥
उद्धरती ते प्राणीं परिवारासहित । देवी त्याला करिसी श्रीपतिसन्निहित ॥ जय. ॥ ४ ॥

बाधा भवभीतीची तव दासां नाही । माये न करिसि मोहा चंचळ तें कांही ॥
ह्रदयीं अखंड माझ्या तूं सदये राही । गोविंदात्मजविप्रा स्वपदासी पाहीं ॥ जय. ॥ ५ ॥

No comments:

Post a Comment